Promoter Of A Company | प्रमोटर म्हणजे काय?

By Equity Xpress24

Published on:

Table of Contents

प्रमोटर म्हणजे काय?

प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, म्हणजे कंपनीचा स्थापक किंवा नियंत्रक भागधारक, अशी व्यक्ती जी कंपनीची सुरुवात करत आणि कंपनीचे मॅनेजमेंट आणि निर्णय प्रक्रिया मध्ये महत्वाचा रोल प्ले करतो. प्रमोटर हे कंपनीच्या प्रगतीसाठी नक्कीच महत्त्वाचे असतात आणि त्यांच्याकडे कंपनीचे बल्क म्हणजेच मोठ्या प्रमाणात शेअर्स असतात.

प्रमोटर किती हिस्सा ठेवू शकतो?

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) च्या नियमानुसार:

  1. लिस्टेड कंपन्यांसाठी (Stock Market मध्ये सूचीबद्ध कंपन्या) – कंपनी जर स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड असेल तर कपंनी चा प्रमोटर 75% पेक्षा जास्त हिस्सेदारी ठेवू शकत नाही. कारण सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी किमान 25% शेअर्स खुले ठेवावे लागतात.
  2. अनलिस्टेड कंपन्यांसाठी (Stock Market मध्ये सूचीबद्ध नसलेल्या कंपन्या) – जर एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट नसेल तर अशा कंपनीमध्ये कंपनीचा प्रमोटर 100% हिस्सेदारी ठेवू शकतो.

विशेष नोंद: काही विशेष स्थितीमध्ये (जसे की स्ट्रेटेजिक इन्व्हेस्टमेंट) सेबी वरील नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देऊ शकते.

कंपनीमध्ये प्रमोटरची भूमिका

प्रमोटर हा कंपनीच्या स्थापनेत आणि वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचे मुख्य कार्य पुढीलप्रमाणे असते:

1. व्यवसाय संकल्पना तयार करणे : कोणत्याही प्रमोटर ची सर्वात महत्त्वाची काम म्हणजे बिजनेस प्रपोजल तयार करणे आणि कंपनी स्थापन करण्याच्या गरजा ठरवणे. सदर बिजनेस संदर्भात मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी आणि त्याचे संभाव्य तोटे या दोन्ही गोष्टीचे एनालिसिस करणे.

2. कंपनीची नोंदणी करणे : कंपनीच्या बिजनेस ला अनुरूप असे कंपनीचे नाव निवडून त्याची उपलब्धता तपासणे. कंपनीची नोंदणी करण्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ती तयार करून रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC) कडे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे.

3. प्रारंभिक भांडवल उभारणे: कोणताही बिजनेस चालवण्यासाठी सर्वात प्राथमिक गरज म्हणजेच भांडवल.

ह्या भांडवलाची व्यवस्था करणे हे कंपनी प्रमोटर चे खूप महत्त्वाचे काम आहे. प्रमोटर हे विविध गुंतवणूकदारांशी चर्चा करून भांडवल उभे करू शकतात

4. कायदेशीर आवश्यकतांचे पालन करणे: कंपनी कायद्यानुसार गरजेच्या सर्व नियम आणि अटींचे पालन करणे.मेमोरँडम ऑफ असोसिएशन (MOA) आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन (AOA) तयार करणे.

5. व्यवस्थापन आणि कर्मचारी नियुक्त करणे : कंपनीसाठी संचालक मंडळ आणि व्यवस्थापन तयार करणे.आवश्यक कर्मचारी आणि अधिकारी नेमणे.

6. व्यवसायासाठी करार करणे : कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक असलेल्या विविध गोष्टींसाठी करार आणि करारनामे तयार करणे.

हे करार व्यवसायाची सुरळीत स्थापना आणि चालना मिळवण्यासाठी महत्त्वाचे असतात.व्यवसायासाठी होणारे प्रमुख करार

1. मालमत्ता आणि जागेसाठी करार (Property & Lease Agreement)

2. वित्तपुरवठ्यासाठी करार (Financial Agreement)

3. भागीदारी किंवा संयुक्त उद्यम करार (Partnership/Joint Venture Agreement)

4. पुरवठादार आणि विक्रेत्यांसाठी करार (Supplier & Vendor Agreement)

5. कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी करार (Employment Agreement)

6. ग्राहक आणि सेवा करार (Client/Service Agreement)

7. फ्रँचायझी करार (Franchise Agreement)

8. गोपनीयता आणि नॉन-डिस्क्लोजर करार (NDA – Non-Disclosure Agreement)

9. मार्केटिंग आणि जाहिरात करार (Marketing & Advertising Agreement)

10. विमा करार (Insurance Agreement)

या सर्व करारांमुळे व्यवसायाची पारदर्शकता वाढते, कायदेशीर समस्या टाळता येतात आणि व्यवसायाची दीर्घकालीन सुरक्षा सुनिश्चित करता येते.

7. कंपनीची पहिली सभा (First Board Meeting) आयोजित करणे: एकदा का कंपनीची स्थापना झाली, त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली सभा बोलावावी लागते , आणि त्यासाठी मध्ये आवश्यकते ठराव म्हणजेच रिझोल्युशन्स पास करून घेणे.

8. कंपनीचे हित जोपासणे : कंपनी स्थापन झाल्यानंतर कंपनीच्या विकासासाठी योग्य धोरणे आखणे आणि कंपनी आर्थिक अस्थैर्यामध्ये येऊ नये म्हणून चुकीचे आर्थिक व्यवहार टाळणे.कंपनीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणे आणि स्वतःच्या फायद्यासाठी गैरव्यवहार टाळणे.

9. गुंतवणूकदार आणि भागधारकांचे हित जपणे: कंपनी कायद्यानुसार कंपनीशी संबंधित गुंतवणूकदारांना आवश्यक ती माहिती पुरवणे. कंपनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणे .प्रमोटरची भूमिका कंपनीच्या स्थापनेपासून ते तिच्या यशस्वी संचालनापर्यंत अत्यंत महत्त्वाची असते.

थोडक्यात, प्रमोटर हा कंपनीच्या स्थापनेसाठी जबाबदार असतो आणि ती यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य करतो.

प्रवर्तकांचा हिस्सा (Promoter Stake) म्हणजे काय?


प्रमोटरचा हिस्सा म्हणजे कंपनीचे संस्थापक, व्यवस्थापक किंवा नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्ती/गटाच्या मालकीच्या भागधारकांमधील टक्केवारी. एखाद्या प्रमोटर कडे किती हिस्सा आहे म्हणजेच किती % स्टेक आहे ह्यावरून कंपनीतील त्यांचे मालकीचे प्रमाण, नियंत्रण आणि संलग्नता दर्शवितो.

प्रवर्तकांचा हिस्सा काय सूचित करतो?


१. मालकी आणि नियंत्रण (Ownership & Control):

  • कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा जितका जास्त असेल , तितके त्याचे कंपनीवरील नियंत्रण, प्रभाव आणि निर्णयक्षमता जास्त असते.
  • उदा., ५०% पेक्षा जास्त हिस्सा असल्यास, प्रवर्तकांना महत्त्वाचे निर्णय लवकर मंजूर करता येतात.

२. संलग्नता आणि विश्वास (Commitment & Confidence):

  • मेजॉरिटी स्टेक असल्यास, प्रवर्तक कंपनीच्या भविष्यावर विश्वास ठेवतात असे समजले जाते.
  • ही बाब गुंतवणूकदारांना कंपनीच्या स्थैर्याबद्दल विश्वासार्हता वाढवणारी ठरते.

३. गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन (Investor Perspective):

  • प्रवर्तकांचा हिस्सा कमी झाल्यास, गुंतवणूकदारांना अशी शंका येऊ शकते की प्रवर्तक स्वतःच कंपनीवर विश्वास ठेवत नाहीत.
  • उलट, हिस्सा वाढल्यास, गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण वाढते.

४. स्थैर्य आणि जोखीम (Stability & Risk):

  • ज्या कंपनीमध्ये प्रमोटर्स कडे जास्त स्टेक असतील तर अशा कंपन्या सामान्यतः “स्थिर” आणि दीर्घकालीन धोरणासाठी ओळखल्या जातात.
  • जर प्रमोटर चा हिस्सा कमी असेल , कंपनीत बाह्य घटकांद्वारे ताबा मिळविण्याची (Takeover) शक्यता वाढते.

५. शेअर बाजारातील प्रभाव (Impact on Share Price):

  • जर प्रवर्तकांनी कंपनीमध्ये त्यांची भागीदारी वाढवल्यास, शेअरची मागणी वाढून किंमत चढू शकते.
  • परंतु जर प्रमोटरनी त्यांची भागीदारी कमी केल्यास म्हणजेच हिस्सा विकल्यास, कंपनीच्या शेअर्सची किंमत कोसळू शकते.

निष्कर्ष:
प्रवर्तकांचा हिस्सा हे कंपनीच्या आर्थिक आरोग्याचे आणि प्रवर्तकांच्या संलग्नतेचे प्रमुख सूचक आहे. गुंतवणूकदार, विश्लेषक आणि बाजार यांसाठी हा एक महत्त्वाचा निर्देशक आहे.

प्रमोटर कधी आणि का त्यांचा स्टेक वाढवतात?

प्रमोटर कंपनीतील त्यांचा हिस्सा (stake) काही विशिष्ट परिस्थितींमध्ये वाढवतात. हे सामान्यतः सकारात्मक संकेत मानले जातात, कारण प्रमोटरचा कंपनीवरील विश्वास वाढतो.

१. कंपनीच्या भविष्यावर आत्मविश्वास (Confidence in Future Growth)

जर प्रमोटरला वाटत असेल की कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ होणार आहे, तर ते अधिक शेअर्स खरेदी करतात.

कंपनीच्या भविष्यातील नवीन प्रकल्प, तंत्रज्ञान किंवा विस्तार योजनांमध्ये मोठी संधी असल्यास, प्रमोटर स्टेक वाढवू शकतात.

२. शेअरची किंमत कमी असणे (Undervalued Stock)

जर कंपनीचे शेअर्स बाजारात कमी किमतीत उपलब्ध असतील, तर प्रमोटर त्या स्वस्तात खरेदी करून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.

कंपनीच्या शेअरची किंमत भविष्यात वाढेल , असा विश्वास जेव्हा प्रमोटर ला असतो तेव्हा ते हिस्सेदारी वाढवतात.

३. विश्वासार्हता आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणे (Boosting Investor Confidence)

जर बाजारात कोणत्याही कारणास्तव कंपनीविषयी नकारात्मकता असेल (जसे की मंदी किंवा अफवा), तर कंपनीचे प्रमोटर कंपनीमध्ये आपला स्टेक वाढवून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवू शकतात.

प्रमोटरने स्टेक वाढवल्यास, गुंतवणूकदारांना वाटते की कंपनी मजबूत आहे आणि भविष्यात चांगले प्रदर्शन करेल.

४. कंपनीच्या नियंत्रणासाठी (Maintaining Control)

जर इतर गुंतवणूकदार किंवा प्रतिस्पर्धी मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी करत असतील, तर प्रमोटर आपले नियंत्रण टिकवण्यासाठी हिस्सेदारी वाढवतात.

काही वेळा विलीनीकरण किंवा अधिग्रहण (Merger & Acquisition) टाळण्यासाठी सुद्धा प्रमोटर कपंनी मध्ये स्टेक वाढवतात.

५. कंपनीच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी (Strengthening Financial Position)

जर कंपनीकडे भांडवलाची आवश्यकता असेल, तर प्रमोटर आपले शेअर्स वाढवून विश्वास निर्माण करतात, ज्यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदारही जसे की म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपनी,डोमेस्टिक फंड हाऊस कंपनीत गुंतवणूक करतात.

थोडक्यात:

प्रमोटर स्टेक वाढवणे हे बहुतेक वेळा सकारात्मक असते, कारण याचा अर्थ ते कंपनीच्या भविष्यावर विश्वास ठेवतात. मात्र, गुंतवणूकदारांनी इतर घटकही विचारात घ्यावे, जसे की कंपनीचा आर्थिक ताळेबंद, उद्योगातील स्थिती आणि प्रमोटरच्या पूर्वीच्या निर्णयांची पार्श्वभूमी.

कंपनीच्या प्रमोटर्सचे प्रकार :

1. प्रारंभिक प्रमोटर (Original Promoter) : प्रारंभिक प्रमोटर म्हणजे कंपनी स्थापन करण्याची संकल्पना प्रथम मांडणारे आणि तिची स्थापना करणारे लोक.उदाहरण: रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी धीरूभाई अंबानी.

2. व्यावसायिक प्रमोटर (Professional Promoter) : व्यावसायिक प्रमोटर म्हणजे अशा व्यक्ती किंवा संस्था ज्या व्यवसाय किंवा कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेत तज्ज्ञ असतात आणि त्या व्यवसायाच्या स्थापनेसाठी विशिष्ट तांत्रिक, आर्थिक किंवा व्यवस्थापन कौशल्य पुरवतात. व्यावसायिक प्रमोटर्स हे स्वतः व्यवसायाच्या मालकीमध्ये भाग घेत नाहीत, फक्त व्यवसायाच्या स्थापनेसाठी मदत करतात.

3. आकस्मिक प्रमोटर ( Occasional Promoter) : हे असे प्रमोटर असतात, जे कोणताही व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने नेहमी कार्यरत नसतात, पण एखाद्या विशिष्ट संधीमुळे किंवा विशेष प्रकल्पासाठी ते प्रमोटर म्हणून काम करतात. व्यवसाय सुरू केल्यानंतर किंवा त्याचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर ते त्या व्यवसायातून बाहेर पडतात.

4. वित्तीय प्रमोटर (Financial Promoter): जे वित्तपुरवठा (फायनान्स) करण्यासाठी कंपनी सुरू करतात.बँका, वित्तीय संस्था, गुंतवणूकदार यांचा समावेश होतो.उदाहरण: आयसीआयसीआय बँकेने प्रमोट केलेली काही वित्तीय कंपन्या.

5. सरकारी प्रमोटर (Government Promoter) : केंद्र किंवा राज्य सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या कंपन्या.उदाहरण: भारतीय स्टेट बँक (SBI), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL).हे प्रमोटर्स कंपनीच्या स्थापनेपासून तिच्या वाढीपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

प्रवर्तकाची कायदेशीर स्थिती (Legal Status of a Promoter)

प्रवर्तक (Promoter) हा कोणत्याही कंपनीच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, पण कायदेशीर दृष्टिकोनातून त्याला कोणताही विशिष्ट अधिकृत दर्जा (Legal Status) दिला गेलेला नाही. परंतु , त्याच्यावर काही महत्त्वाच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि जबाबदारी (Liabilities) असतात.

1. कंपनी कायद्यानुसार (Companies Act, 2013 – India)

भारतातील कंपनी अधिनियम 2013 नुसार, प्रवर्तक ही अशी कोणतीही व्यक्ती आहे, जो –

  • कंपनीच्या स्थापनेत सक्रिय भूमिका बजावतो.
  • कंपनीच्या प्रगतीसाठी आणि नोंदणी प्रक्रियेस मदत करतो.
  • कंपनीच्या पहिल्या संचालकांची नियुक्ती करतो.

परंतु, प्रवर्तक हा कायद्याच्या दृष्टिकोनातून ना मालक असतो, ना भागीदार, ना एजंट, ना विश्वस्त (Trustee) – परंतु त्याच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि जबाबदारी असतात.

2. प्रवर्तकाची कायदेशीर जबाबदारी (Legal Liabilities of a Promoter)

(a) विश्वासाचा संबंध (Fiduciary Relationship)

  • प्रवर्तक आणि कंपनी यांच्यात विश्वासाचे नाते असते.
  • प्रवर्तकाने कंपनीच्या फायद्यासाठी कार्य करणे अपेक्षित असते, कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही.
  • जर कंपनीच्या मालमत्तेचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्यास तो कायदेशीर कारवाईला पात्र ठरतो.

(b) गैरवर्तन आणि फसवणूक (Fraud & Misrepresentation)

  • प्रवर्तकाने गुंतवणूकदारांना चुकीची माहिती दिल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीत सहभागी असल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा (Criminal Liability) दाखल केला जाऊ शकतो.
  • जर कपंनी प्रमोटर ने तोट्याचे व्यवहार (Undisclosed Profits) केले किंवा कंपनीच्या भांडवलाचा गैरवापर केल्यास, त्याला ती रक्कम परत करावी लागू शकते.

(c) कंपनीच्या करारांबाबत जबाबदारी (Pre-Incorporation Contracts Liability)

  • कंपनी नोंदणीपूर्वी (Pre-Incorporation Stage) प्रवर्तकाने केलेल्या करारांसाठी तो स्वतः जबाबदार राहतो.
  • कंपनी नोंदणीनंतर त्या करारांना मान्यता दिली गेली, तर कंपनी जबाबदार ठरते, अन्यथा प्रवर्तकाची जबाबदारी राहते.

(d) दिवाळखोरी (Insolvency) बाबत जबाबदारी

  • जर प्रमोटर नी केलेल्या आर्थिक अनियमितेमुळे जर कंपनी दिवाळखोरीत गेली, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • काही प्रकरणांमध्ये, प्रवर्तकाची वैयक्तिक मालमत्ता सुद्धा जप्त केली जाऊ शकते.

(e) गुंतवणूकदारांचे हित जपणे (Protection of Investors’ Interests)

  • प्रवर्तकाने गुंतवणूकदारांना चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे कायदेशीर गुन्हा मानला जातो.
  • SEBI (Securities and Exchange Board of India) सारख्या संस्थांनी गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत.

3. प्रवर्तकाच्या अधिकारांची मर्यादा (Limitations on Promoter’s Rights)

  • प्रवर्तक हा कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी (Official Representative) नसतो.
  • एकदा कंपनी स्थापन झाली की, प्रवर्तकाचे अधिकार संपतात, आणि संचालक मंडळ (Board of Directors) कंपनी चालवण्याची जबाबदारी घेतो.
  • प्रवर्तकाला स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचा गुप्त नफा (Secret Profit) मिळवण्याचा अधिकार नाही.

4. न्यायालयीन निर्णय (Landmark Court Judgments on Promoters’ Liability)

  • Erlanger v. New Sombrero Phosphate Co. (1878) – या प्रकरणात स्पष्ट केले गेले की प्रवर्तकाने कंपनीच्या हितासाठी कार्य करणे आवश्यक आहे आणि कोणताही लपवलेला नफा (Undisclosed Profit) केल्यास त्याला जबाबदार धरण्यात येईल.
  • Twycross v. Grant (1877) – न्यायालयाच्या मतानुसार,प्रवर्तकाची भूमिका केवळ कंपनी सुरू करण्यापुरती मर्यादित असली, तरीही त्याने कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत.

निष्कर्ष:

प्रवर्तकाला कायदेशीर दर्जा नसला तरी तो कंपनीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्यावर कायदेशीर जबाबदाऱ्या असतात आणि तो कंपनीच्या हितासाठी कार्य करण्यास बांधील असतो. गैरव्यवहार, फसवणूक किंवा विश्वासघात केल्यास त्याच्यावर फौजदारी किंवा दिवाणी कारवाई होऊ शकते.

Leave a Comment