मोका या धोका | 9 महिन्यात 70 टक्के खाली आला हा शेअर

By Equity Xpress24

Published on:

Gensol Engineering Ltd | जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेड:

भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेड (GEL) या कंपनीबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू आहेत. फक्त गुंतवणूकदारच नव्हे तर कंपन्यांना आर्थिक परिस्थितीचे रेटिंग देणाऱ्या क्रेडिट रेटिंग एजन्सी सुद्धा या कंपनीच्या भवितव्याबाबत आता साशंकता बाळगताना दिसत आहेत .

पाच दिवसात तब्बल 40 टक्क्यांची घसरण

  • मागील नऊ महिन्यांमध्ये जेन्सोलचा शेअर तब्बल 70% खाली आला.
  • गेल्या केवळ पाच दिवसांत जेन्सोलच्या शेअरच्या किमतीत तब्बल ४०% घसरण झाली आहे, आणि जेन्सोलच्या शेअर्सची ही अवस्था पाहून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची पाचावर धारण बसली आहे.

काय करते कंपनी

  • तसे पहायला गेले, तर जेन्सोल ही काही नवीन कंपनी नाही. Gensol Engineering Ltd ही गुजरातची औद्योगिक राजधानी अहमदाबाद येथे कार्यरत आहे.
  • ही कंपनी अक्षय्य ऊर्जा आणि EV म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रामध्ये काम करत असून प्रामुख्याने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या (Solar EPC) अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) तसेच ऑपरेशन आणि मेंटेनन्स (O&M) सेवा पुरवते.
  • सौरऊर्जा प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी कन्सल्टींग सर्व्हिसेस , डिझाइन आणि इन्स्टॉलेशन सेवा पुरवते. कंपनीचे भारतासह परदेशातही काही प्रकल्प आहेत.

तसेच, जेन्सोलने अलीकडेच इलेक्ट्रिक वाहन (EV) लीजिंग आणि मोबिलिटी सेवांमध्येही काम सुरू केले आहे .

  • जेन्सोलचे प्रमोटर ब्लूस्मार्ट (BluSmart) या इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपचेही संस्थापक आहेत. ब्लूस्मार्ट इलेक्ट्रिक ही कंपनी कॅब सर्विस पुरवते आणि ब्लू स्मार्ट हे भारतातील EV आधारित वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव बनले आहे.

२०१९ मध्ये जेन्सोल ने भारतीय शेअर बाजार मध्ये SME IPO च्या माध्यमातून सूचीबद्ध करून घेतले. सरकारचा विशेष फोकस असलेल्या अक्षय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) मोबिलिटी क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचा उत्साह मिळाला.

  • कंपनीचा व्यवसाय आणि महसूल वेगाने वाढत असल्याने 2023 मध्ये NSE आणि BSE च्या मुख्य प्लॅटफॉर्मवर त्याचा समावेश करण्यात आला.
  • जेन्सोलची ऑर्डर बुक स्ट्रॉंग होती. कंपनीला चांगला महसूल देखील मिळत होता आणि कंपनीकडे मोठ्या विस्तार योजना होत्या. सुरुवातीच्या वाढीनंतर, अलीकडील आर्थिक अडचणींमुळे कंपनीच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

सध्याच्या समस्या आणि आव्हाने:

  • कंपनीवर ₹1,146 कोटींचे मोठे कर्ज आहे.
  • ब्लूस्मार्ट देखील आर्थिक अडचणीत आहे आणि त्याचा परिणाम जेन्सोलच्या स्थिरतेवर झाला आहे.
  • प्रवर्तकांनी मोठ्या प्रमाणावर आपले शेअर्स तारण ठेवले आहेत, ज्यामुळे अधिक जोखीम निर्माण झाली आहे.

कशामुळे बसली गुंतवणूकदारांच्या मनामध्ये भीती

2024 च्या मध्यापर्यंत सर्वकाही सुरळीत चालू होते मग आता अचानक गुंतवणूकदार एवढे का घाबरत आहेत?

क्रेडिट रेटिंग डाउनग्रेड

  • काही दिवसांपूर्वी, दोन महत्त्वाच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीं कडून जेन्सोलच्या क्रेडिट रेटिंगमध्ये मोठी कपात करण्यात आली. त्या महत्त्वाच्या क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजे ICRA आणि केअर रेटिंग्ज.
  • मित्रांनो क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजे, कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या क्षमतेचे मूल्यमापन करणारी संस्था. विविध मापकांवर ह्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज कंपन्यांचे रेटिंग कमी किंवा जास्त करत असतात
  • काही दिवसांपूर्वीपर्यंत जेन्सोलची क्रेडिट रेटिंग BBB- होते, परंतु दोनच दिवसांपूर्वी आलेल्या अपडेट नुसार जेन्सोलला थेट D रेटिंग देण्यात आले. D रेटिंग ला एखाद्या कंपनीसाठी आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते.
  • क्रेडिट रेटिंग एजन्सी कंपन्यांची आर्थिक स्थिती तपासून त्यांना AAA (सर्वोत्तम) ते D (डिफॉल्ट जोखीम) असे रेटिंग देतात.
  • D रेटिंग मिळणे म्हणजे कंपनी मोठ्या आर्थिक अडचणीत असून कर्जफेडीचा संघर्ष करत आहे असा सरळ सरळ अर्थ निघतो. आणि जेन्सोलच्या बाबतीतही हेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्जाचा डोंगर आणि कॅश फ्लो ची समस्या

  • जेन्सोल वर सध्या ₹१,१४६ कोटींचे कर्ज आहे, तर त्यांच्याकडे असणारे भांडवल फक्त ₹५८९ कोटी आहे. याचा अर्थ कर्ज-ते-इक्विटी गुणोत्तर जवळपास २ पट आहे, जे कंपनीची आर्थिक स्थिती बरी नाही हेच दर्शवत आहे .
  • खरी समस्या म्हणजे कंपनी वेळेवर कर्जफेड करू शकत नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे , कंपनी रेटिंग एजन्सींना सांगत होती की सर्व कर्जे वेळेवर फेडली जात आहेत.
  • पण जर आर्थिक स्थिती इतकी गंभीर असेल, तर कंपनीने खरेच संपूर्ण सत्य सांगीतल का ? हा गुंतवणूकदारांसाठी मोठा यक्षप्रश्न आहे.

ऑर्डर बुक तब्बल ७,००० कोटी– पण त्याचा उपयोग किती?

  • जेन्सोलची ऑर्डर बुक जर पाहिली तर कंपनीकडे ₹७,००० कोटींचे ऑर्डर बुक आहे, जे कागदपत्री पाहता मोठे महसूल मिळवण्याची शक्यता तर दाखवते . पण ऑर्डर मिळणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात.
  • जेन्सोलकडे जर नवीन गुंतवणुकीसाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेशी रोख रक्कमच जर शिल्लक नसेल, तर हे ऑर्डर बुक फारसा उपयोगी ठरणार नाही.

प्रमोटर चे तब्बल 82 टक्के शेअर्स तारण आहेत

  • सध्या जेन्सोलच्या प्रवर्तकांनी (Promoters) ८२% शेअर्स तारण ठेवले आहेत. काही महिन्यांपूर्वी हे प्रमाण ८०% होते.
  • एखाद्या कंपनीच्या प्रमोटर चे 80 टक्के शेअर्स तारण असणे हे प्रमाण खूप जास्त असून गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे.
  • एखाद्या कंपनीचे प्रमोटर जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात शेअर्स गहाण ठेवतात , तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा असतो की कंपनीला मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे जो निधी ते शेअर्स गहाण ठेवून उभा करत आहेत .
  • समजा जर शेअरची किंमत आणखी घसरली, तर बँका आणि कर्ज देणारे अधिक तारण मागतील किंवा गहाण ठेवलेले शेअर्स विकू शकतात , ज्यामुळे शेअरची किंमत अधिकच खाली येऊ शकते.

ब्लूस्मार्ट मोबिलिटी ची स्थिती

  • जेन्सोलच्या ब्लूस्मार्ट मोबिलिटी या उपकंपनीची परिस्थितीही फारशी चांगली नाही. कंपनीला नफा मिळत नाही, आणि अलीकडेच ती नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (NCDs) वर डिफॉल्ट झाली आहे. याचा थेट परिणाम जेन्सोलच्या आर्थिक स्थैर्यावर होत आहे.

कंपनीच्या स्पष्टीकरणावर गुंतवणूकदारांचा कितपत विश्वास?

रेटिंग घसरल्यानंतर औपचारिकता म्हणून जेन्सोल व्यवस्थापनाने तातडीने स्पष्टीकरण दिले.

  • त्यांनी सांगितले की, चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये कॅश फ्लो मध्ये तफावत असल्यामुळे कंपनीवर आर्थिक दबाव आहे, पण कुठलाही आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही.
  • कंपनीकडून असेही सांगण्यात आले की, चालू वित्त वर्षांमध्ये महसूल ४२% वाढला,ऑपरेटिंग नफ्यात ८९% वाढ,आणि निव्वळ नफ्यात ३४% वाढ झाली.
  • तसेच, कंपनीने ₹६६५ कोटींच्या कर्जफेडीची योजना तयार केली आणि आतापर्यंत ₹२३० कोटी परतफेड सुद्धा झाल्याचे सांगितले.

पण या स्पष्टीकरणानंतरही बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, आणि शेअरची घसरण सुरूच आहे.

भविष्यातील दिशा:

जेन्सोल सध्या त्यांच्या काही मालमत्त्यांची विक्री करून कर्ज कमी करून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करीत आहे,. मात्र, गुंतवणूकदारांमध्ये विश्वास पुनर्स्थापित करणे आणि शेअरहोल्डर्सचे नुकसान टाळणे हे कंपनीसाठी आव्हानात्मक बनले आहे .

गुंतवणूक करताना नेहमी लक्षात ठेवा –

सावधगिरी बाळगा!

  • जेव्हा कागदोपत्री संख्या आणि प्रत्यक्ष स्थिती जुळत नाहीत, तेव्हा सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.काही गुंतवणूकदारांना ही संधी वाटू शकते, परंतु सद्यस्थितीला जेनसॉलमध्ये सतत लोअर सर्किट लागत आहे. येत्या तीन-सहा महिन्यांत लगेच कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा अंदाज लावणे तूर्तास तरी धोकादायक ठरू शकतो.

जर तुम्ही आधीच जेन्सोलमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा त्याचा विचार करत असाल, तर तुमच्या गुंतवणुकी बाबत काळजीपूर्वक विचार करा. कंपनीची वास्तविक आर्थिक स्थिती, प्रमोटर्स चा सहभाग, आणि कॅश फ्लो ची क्षमता आणि इतर आवश्यक पॅरामीटर तपासल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका.—

  • जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेड ही एकेकाळी वेगाने वाढणारी कंपनी होती, परंतु कर्ज आणि व्यवस्थापन संबंधित समस्यांमुळे सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. भविष्यात, कंपनी या अडचणींवर कशी मात करते यावरच कंपनीचे आणि त्याच बरोबर कंपनी मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणूकदारांचे भवितव्य अवलंबून आहे

अस्वीकरण: ही माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीपर हेतूसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचे संशोधन करावे किंवा वित्ततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment